Welcome in DRUSHTI - VISION FOR BLIND
13 November 2025
४८५ दिव्यांग बांधव-भगिनींना दिवाळी फराळ वाटप — दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड पुणेचा सामाजिक उपक्रम
पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२५ :
दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे या संस्थेच्या वतीने आणि श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, निगडी तसेच जे.एस.व्ही. फ्रेंड्स ग्रुप, पुणे यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधव-भगिनींसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी फराळ वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या ६ वर्षापासून हा उपक्रम यशस्वीपणे चालू आहे. या उपक्रमात एकूण ४८५ दिव्यांग बांधव-भगिनींना पारंपरिक फराळाचे( लाडू , खाजा, शंकरपाळी, शेव, चिवडा, अनारसा इ. ) वाटप करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक श्री. सागर धुमाळ यांच्या संकल्पनेतून जन्म घेतलेल्या या संस्थेने गेल्या १२ वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींच्या शैक्षणिक , सांस्कृतिक, व्यावसायिक आणि सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवले आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथुन २०१३ साली मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने संस्थेची सुरुवात झाली आणि आज ती महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सकाळी ११ वाजता श्रीकृष्ण मंदिर, निगडी येथे करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांसाठी खास बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद समाधानाने लुटला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते —
श्री. प्रवीण पवार (सीनियर मॅनेजर, CSR – किर्लोस्कर फेरर्स इंडस्ट्री कंपनी),
श्री. राकेश कांबळे (CSR, सायबेज कंपनी, पुणे),
श्री. अनिकेत बनसोडे,
श्री. सी. पी. शशिधरन (अध्यक्ष, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट, निगडी),
श्री. सुरेंद्र सतानी, श्री. कैलाश टिळे, आणि श्री. जितेंद्र कुमार (संगणक अभियंता).
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसुधाताई देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. भुलेश्वर बोरुडे यांनी मानले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी दृष्टी व्हिजनच्या कार्याचे कौतुक करत, समाजातील प्रत्येकाने दिव्यांग बांधवांसोबत सण साजरा करण्याची भावना व्यक्त केली.
उपक्रमात सौ. भावना कुतवाल पाटील (खजिनदार), ॲड. जयश्री बोरुडे (सदस्य), तसेच सुरेंद्रसिंह, रश्मी अभ्यंकर, मेघा गांवकर, कृतिका, सविता, दिव्या आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जे.एस.व्ही. फ्रेंड्स ग्रुप, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट आणि दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.
या सामाजिक उपक्रमाद्वारे
समाजात आत्मीयता, सहभाग आणि समावेशकतेची भावना अधिक दृढ झाली आहे.